बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संस्थाचालक आणि पोलिसांकडून हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी पीडित मुलींच्या पालकांची तक्रार नोंदवून घ्यायला 12 तास लावले. त्यामुळे पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले होते. या संतप्त नागरिकांनी मंगळवारी सकाळी हजारोंच्या संख्येने शाळेवर मोर्चा काढला होता. त्यानंतर नागरिकांनी बदलापूरमध्ये रेल्वे ट्रॅकवर उतरत मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली होती. नागरिकांच्या या संतप्त प्रतिसादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.